पोलीस खात्यात खळबळ – सोलापूर रस्त्यावर कवडीपाट टोलनाक्यावर केली कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी बसेसला प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याच दरम्यान पोलिसांकडून लाचेची मागणी होत असल्याचे प्रकार समोर आले आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स बसेसवर कारवाई न करण्यासाठी लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या पोलीस शिपायाला 5 हजाराची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
सुहास भास्कर हजारे (वय-35) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या वाहतूक पोलीस शिपायाचे नाव आहे. याप्रकरणी 27 वर्षीय ट्रॅव्हल्स एजन्सीच्या मॅनेजरने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार शनिवारी (दि.4) लोणी काळभोर टोलनाक्याजवळील कवडीपाट येथे कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांच्या एजन्सीच्या बसेस स्वारगेट ते सोलापूर अशी प्रवाशांची वाहतूक करतात. तक्रारदार यांच्या ट्रॅव्हल्सच्या बसेसवर कारवाई न करण्यासाठी हजारे याने दर महिना 6 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने पडताळणी केली. त्यावेळी सुहास हजारे याने ट्रॅव्हल्सवर कारवाई न करण्यासाठी 6 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीत 5 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले. पथकाने आज कवडीपाट येथे सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून 5 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अलका सरग करीत आहेत.
