कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : उंड्रीतील घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अलीकडे ऑनलाइन खरेदीची टूमच आली आहे. त्यामुळे प्रत्येकजण काही ना काही ऑनलाईन वस्तू मागवत असतात. त्याची डिलिव्हरी देण्यासाठी डिलिव्हरी बॉय कधीही घरी येत असतात. अशाच एका घरात डिलिव्हरी बॉयने रात्री उशिरा डिलिव्हरी देण्यासाठी आला आणि घरात एका 23 वर्षीय तरुणीला पाहून त्याने आपल्या पँटची चैन उघडून लज्जास्पद कृत्य केले.
सतिश केंधले (रोमान्ना फॅशन्स इंडिया कंपनीचा डिलिव्हरी बॉय) याच्यावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी उंड्रीतील २३ वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी तरुणीने एक्से पॅरिस ब्रॅड व्हाया रोमान्ना फॅशन्स इंडिया या कंपनीची लॅपटॉप बॅग ऑर्डर केली होती. या लॅपटॉप बॅगची डिलिव्हरी करण्यासाठी १ डिसेंबर रोजी रात्री पावणेदहा वाजता कंपनीचा डिलिव्हरी बॉय सतीश केंधले आला होता. त्याने आपल्या पँटची चैन उघडून लज्जास्पद कृत्य केले. त्याची माहिती झाल्यावर फिर्यादी यांच्या आईने त्याला फोन करुन जाब विचारला असता त्याने आमी कोणालाही घाबरत नाही, काय करायचे ते करा, असे बोलून फिर्यादीच्या आईला धमकी दिली.
फिर्यादी यांनी त्याची कंपनीकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दगडे तपास करीत आहेत.
