कुलगुरू डॉ. प्रा. नितीन करमळकर : रेखाचित्राचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन केला गौरव
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : तंत्रज्ञान गुन्हेगारांना सहज उपलब्ध होत असून, कालानुरूप गुन्ह्याचे स्वरूप बदलत आहे. त्यामुळे फरार आरोपी सद्यस्थिती कसा दिसत असेल त्याची विविधरुपांची रेखाचित्रे काढणे व गुन्हा करून फरार झालेला गुन्हेगार, बेवारस मयताची ओळख पटविणे, करोडोंमधून त्याला शोधून काढणे, सीसीटीव्ही फुटेजमधील अस्पष्ट व्यक्ती, व्हीडिओ एडिटिंगच्या साहाय्याने स्पष्टता विकसित करणे व त्यावरून व्यक्ती रेखाचित्र रेखाटन व शिल्प तयार करणे, पोलीस यंत्रणेला गुन्हेगाराच्या वर्णनावरून रेखाचित्र काढून घेणे अनिवार्य ठरणार आहे. त्यासाठी रेखाचित्रकाराची मोठी मदत अनिवार्य आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी स्पष्ट केले.
राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, मुख्यालय पुणे येथे रेखाचित्र कक्षाचे उद्घाटन तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल यांच्या हस्ते ६ जून २०२० रोजी करण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पाच पोलीस अधिकारी, अंमलदार यांना प्रशिक्षित करण्याबाबत त्यांनी मानस व्यक्त केला होता. त्यानुसार आतापर्यंत ८३ पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी प्रशिक्षणासाठी इच्छा दर्शविली. रेखाचित्र विभागाचे तत्कालीन अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रा. नितीन करमळकर यांनी पोलीस दलातील अधिकारी अंमलदार यांना प्रसिक्षण देऊन २ नोव्हेंबर २०२० रोजी गुन्हे अन्वेषण विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याशी समन्वय करून मुहूर्तमेढ रोवली आहे.
दरम्यान, १ फेब्रुवारी २०२१ ते २२ एप्रिल २०२१ या कालावधीत प्रथम सत्रातील १८ पोलीस अधिकारी-अंमलदार यांनी ५५ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यांना अतुलचंद्र कुलकर्णी आणि कुलगुरू डॉ. प्रा. नितीन करमळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच द्वितीयसत्रामध्ये २३ ऑगस्ट ते १२ नोव्हेंबर २०२१ दरम्यान पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ७ पोलीस अंमलदार, पुणे पोलीस आयुक्तालयातील एक व गुन्हे अन्वेषण विभागातील पाच असे एकूण १३ पोलीस अंमलदारांनी ५५ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनाही कुलगुरू डॉ. प्रा. नितीन करमळकर, अतुलचंद्र कुलकर्णी, रितेश कुमार, यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, पोलीस अधीक्षक संभाजी कदम, पोलीस अधीक्षक दिनेश बारी, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे सहकार्यवाह डॉ. महादेव सगरे, पुणे विद्यापीठाचे अविनाश कुंभार उपस्थित होते.
भारती विद्यापीठाचे प्रा. डॉ. शिरीष चरवड प्रशिक्षण देणार आहेत. प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये प्रशिक्षणार्थींनी काढलेल्या रेखाचित्राचे तज्ज्ञ समीर धर्माधिकारी, नुपूर मोहनकर यांनी परीक्षण करून मूल्यमापन केले आहे. अविनाश कुंभार यांनी स्वागत केले. अनुजा देशमाने यांनी प्रास्ताविक केले. संभाजी कदम यांनी आभार मानले.
