हडपसर पोलिसांत गुन्हा : म्हाडा कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : दोनशे रुपये उधारी असताना पाचशे रुपये मागितल्याच्या रागातून वाद घालत डोक्यात कोयत्याने वार करून जखमी करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्यास अटक केले. ससाणेनगरमधील गंधर्व हॉटेलशेजारी म्हाडा कॉलनीकडे जाणाऱ्यार रस्त्यावर १३ डिसेंबर २०२१ रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.
दत्ता विठ्ठल भुसणे (वय २८, रा. गल्ली नं.११, ससाणेनगर, डी.पी. रोड, गंधर्व वाईनसमोर, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय चोडमल (वय २९, रा. रामटेकडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, दोनशे रुपये उधारी असताना पाचशे रुपये मागू लागले, हे बरोबर नाही, असे सांगितले. याचा राग आल्याने शिवीगाळ करीत लोखंडी कोयता काढून तुझी लायकी नसतानाही तू आमच्याशी वाद घालतो, तुला आज जिवंत सोडत नाही, असे म्हणून फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले.
यावेळी रस्त्याने जाणाऱ्या लोकांना हातातील कोयता वर करून कोणी वाचवण्यास आले, तर त्याला सोडणार नाही, आमच्याशी जो नडतो, त्याची आम्ही अशी अवस्था करतो, असे बोलून दहशत निर्माण केली. हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके पुढील तपास करीत आहेत.
