वानवडी पोलिसांची कामगिरी : एक लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातून वाहन चोरी करून पळून जाणाऱ्या दोन सराईतांना वानवडी पोलिसांनी जेरबंद केले. आरोपींकडून एक लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दादा बाळू शिंदे (वय ४२, रा. गल्ली नं.८, बिराजदारनगर, सुरक्षानगर, हडपसर), बिभीषण जगताप (रा. हडपसर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, वानवडी पोलीस स्टेशन घोरपडी बाजार चौकी हद्दीतील डोबरवाडी भागात वाहनचोरीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग सुरू होती. त्यावेळी शहरातून वाहनचोरी करून घोरपडी बाजार येथील डोबरवाडीमधून बाहेर जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा रचून ताब्यात घेऊन तपास केला असता, त्याने बिभीषण जगताप याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून तीन वाहने, १० ग्रॅम सोने व आठ हजार रोख रक्कम असा एकूण एक लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर वानवडी-३, हडपसर-१, चंदननगर-१ असे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, सहायक पोलीस फौजदार संतोष तानवडे, पोलीस हवालदार राजू रासगे, संजय बागल, विनोद भंडलकर, सर्फराज देशमुख, शिरीष गोसावी, पोलीस अंमलदार अमित चिव्हे, दीपक भोइर, गणेश खरात, निळकंठ राठोड, सिद्धेश्वर कसबे, महिला पोलीस अंमलदार राणी खांदवे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
