महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील फार्मास्युटिक्स विभागातील सहयोगी प्राध्यापिका डॉ. पल्लवी चौधरी यांना फार्मसी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व योगदानाबद्दल “प्रा. जी. आर. एकबोटे वुमन फार्मासिस्ट ऑफ द इयर” हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सातारा येथे आयोजित महाराष्ट्र राज्य शाखेच्या “महा एप्टिकॉन २०२६” या वार्षिक परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय औषधनिर्माणशास्त्र शिक्षक संघटनेतर्फे (एपीटीआय) हा सन्मान दिला जातो. सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ. प्रिया शिंदे यांच्या हस्ते डॉ. पल्लवी चौधरी यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
फार्मसी क्षेत्रातील महिलांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. औषधनिर्माणशास्त्र शिक्षण अध्यापन, संशोधन, आरोग्यसेवा तसेच समाजोपयोगी कार्यात दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल डॉ. पल्लवी मनोजकुमार चौधरी यांना हा पुरस्कार देण्यात आला.
प्रा. डॉ. पल्लवी चौधरी यांना १८ वर्षांहून अधिक अध्यापन व संशोधनाचा अनुभव असून त्यांच्या नावावर ५० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांच्या नावावर ५ पेटंट प्रकाशित झाले असून त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये पोस्टर व मौखिक सादरीकरणे केली आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संकुल संचालक रिअर ॲडमिरल अमित विक्रम (नि.) आणि प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी प्रा. डॉ. पल्लवी चौधरी यांचे अभिनंदन केले.



















