मोक्का कारवाईनंतर होता फरार : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-१ची कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : गुन्ह्यात फरार असलेल्या पुण्यातील सराईत गुन्हेगाराच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई पुण्यातील शिवणे येथील शिंदे पुलाजवळ केली. आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर तो फरार झाला होता.
अक्षय रविंद्र खवळे (रा. रामनगर, वारजे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खंडणी विरोधी पथक-१चे पोलीस अधिकारी कर्मचारी गुरुवारी हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी उत्तमनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यातील आरोपी अक्षय खवळे हा शिवणे येथील शिंदे पुलाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलगा पुण्यातील वारजे येथे भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार अमोल आव्हाड, विजय कांबळे, नितीन कांबळे, रमेश चौधर, गजानन सोनवलकर, दुर्योधन गुरव, अमर पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
