मुंढव्याच्या केशवनगरमधील घटना : कोरोनामुळे आर्थिक संकटांचा सामना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच ओमायक्रॉनचं संकटही आणखी गडद होत चालले आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षात देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. सामान्य नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे लागू करण्यात येणऱ्या निर्बंधामुळे आणि नोकरी गेल्यामुळे आलेल्या नैराश्येतून पुण्यातील एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे.
दत्ता पुशीलकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, दत्ता हा पुण्यातील केशवनगर मुंढवा येथे राहत होता. तो पुण्यातील नांदे तलावात जीवरक्षक म्हणून काम करत होता. परंतु लॉकडाऊनमध्ये जलतरण तलाव बंद झाले आणि दत्ताची नोकरी गेली. 2020 पासून काम नसल्याने तो नैराश्यात होता. यातच त्याची आर्थिक घडी बिघडल्याने कौटुंबिक कलह वाढले होते. या सर्वाला वैतागून दत्ताने आत्महत्येचे पाऊल उचलले.
कोरोनामुळे अनेकजण झाले बेरोजगार…
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांचे व्यवसाय बंद झाले आहेत. त्यामुळे घरगाडा कसा चालवायचा असा प्रश्न अनेकांपुढे आहे. कोरोनामुळे लागू करण्यात येणाऱ्या निर्बंधांमुळे घर आणि व्यवसाय सांभाळण कठिण होऊन बसलं आहे. बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अनेकजणांनी आत्महत्या केल्या आहेत.

















