हडपसर पोलिसांत फिर्याद : टीका भाजण्याच्या लोखंडी सळईने मारीत केली अश्लील शिवीगाळ
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बिर्याणीवरुन वाद झाल्याच्या घटना पुण्यात यापूर्वी घडल्या आहे. तो वाद संपत नाही तोच आता पुन्हा एकदा बिर्याणीवरुन वाद झाला आहे. बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन एका केटरिंग व्यावसायिकाला तीन जणांनी लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. हा प्रकार पुण्यातील हडपसर परिसरातील बोराटे नगरमध्ये बुधवारी (दि.12) रात्री घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
ऋषिकेश समाधान कोलगे (वय-23), शुभम हनुमंत लोंढे (वय-23), विनायक परशुराम मुरगंडी (वय-21) असे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मैनुद्दीन जलील खान (वय-42) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, हडपसर परिसरातील काळेबोराटेनगर परिसरात फिर्यादी यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. याठिकाणी ते बिर्याणी इतर खाद्य पदार्थ तयार करुन पार्सल देण्याचे काम करतात. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास आरोपींनी फिर्यादीकडून बिर्याणी पार्सल घेतली. फिर्यादी यांनी बिर्याणीचे पैसे मागितल्यावर आरोपींनी टीका भाजण्याच्या सळईने त्यांना बेदम मारहाण केली. तसेच अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन दुकानाची तोडफोड केली. मैनुद्दीन खान यांनी गुरुवारी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.
















