भाजपच्या माजी नगरसेवकावर गुन्हा : आंबिलओढा येथील पीएमसी कॉलनीत घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : थकीत वीजबिलाची वसुली करण्यासाठी आलेल्या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला भाजपच्या माजी नगरसेवकाने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. वीजबिल थकल्याने वीज कनेक्शन कट करण्यासाठी आल्याच्या रागातून माजी नगरसेवकांनी अधिकाऱ्याला मारहाण केली. ही घटना पुण्यातील आंबील ओढा परिसरातील पीएमसी कॉलनीत गुरुवारी (दि.13) सकाळी 11 च्या सुमारास घडली.
याप्रकरणी महावितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ सफल शांताराम यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्तवाडी पोलिसांनी भाजपचे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी हे नवी पेठेतील महावितरण कार्यालयात कार्यरत आहेत. गुरुवारी सकाळी ते आपल्या काही सहकाऱ्यांसह आंबिल ओढा परिसरातील सानेगुरुजी वसाहत येथे थकीत वीजबिल वसुलीसाठी गेले होते. वीजबिल थकल्याने फिर्यादी वीज कनेक्शन कट करत असताना माजी नगरसेवक धनंजय जाधव हे त्या ठिकाणी आले. धनंजय जाधव यांनी मी लाईट बिल भरले आहे, तू मला ओळखत नाही का, मी माजी नगरसेवक आहे, तू आमच्या दारात का आला, कोणाचे घर आहे हे बघून येता येत नाही का, असे बोलून फिर्यादी यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांच्या शर्टचे बटण तोडून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कस्पटे करीत आहेत.
