स्पेशल सेल शाखेची दमदार कारवाई : फॉर्म, फोटो, कागदपत्रे आणि मनपा सदस्यांच्या नावाचे शिक्के केले जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बनावट आधार कार्ड बनवून देणाऱ्याच्या विशेष शाखेच्या स्पेशल सेलने मुसक्या आवळल्या. बी. टी. कवडे रोडवरील स्काय स्टार मल्टी सर्व्हिसेस येथे छापा टाकून आधार कार्ड काढण्यासाठी आणि दुरुस्तीसाठीची कागदपत्रे, फोटो, मनपा सदस्यांच्या नावाचा शिक्का, फॉर्म आदी साहित्य जप्त केले.
अजिज युसूफ शेख (रा. गजानन हौसिंग सोसायटी, घोरपडी गाव, पुणे) आणि जोरना हसीम शेख (रा. गुरुवार पेठ, सिंहगड रोड, पुणे) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांवर मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी स्पेशल सेलचे पोलीस अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. विशेष शाखेकडील पोलीस अधिकारी-अंमलदार यांना स्काय मल्टी सर्व्हिसेस शॉप नं.७ वनराज कॉर्नर बिल्डिंग, बी. टी. कवडे रोड येथे खोटी कागदपत्रे देऊन खोटे आधार कार्ड बनवित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत छापा टाकून दोघांना ताब्यात घेऊन दुकानाची झडती घेतली. त्यावेळी दुकानामध्ये नवीन आधारकार्ड, दुरुस्ती करण्यासाठीचे शासनाने निर्धारित केलेले १० फॉर्म आढळले. त्यावर वेगवेगळ्या व्यक्तींची नावे, पत्ते, फोटोसह माहिती मिळाली. त्या फॉर्मवर पुणे मनपा नगरसेवकाचे नाव असलेला आडवा व गोल शिक्का मारलेले फॉर्म मिळून आले. मुंढवा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने पुढील तपास करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र साळुंके, स्पेशल सेलकडील सहायक पोलीस निरीक्षक वासंती जाधव, पोलीस उपनिरीक्षक अब्दुल करीम सैय्यद, सहायक पोलीस फौजदार अनिल घाडगे, ईस्माईल शेख, सुधीर देशमुख, विजय भोसले, पोलीस हवालदार भरत रणसिंग, प्रमोद घाडगे, महिला पोलीस नाईक, शुभांगी तारी, राजू धेंडे यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
