कोथरूड पोलिसांत फिर्याद : पैशासाठी केला जात होता मानसिक, शारीरिक छळ
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी पती, सासू-सासरे, नणंद व आजोबा यांच्यावर हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ३० जानेवारी २०२० रोजी लग्न झाल्यापासून आजपर्यंत सासरची (सोयता, ता. जि. वासीम, लग्नानंतर हनुमाननगर, केळेवाडी, कोथरूड, पुणे) येथील भाड्याच्या घरामध्ये पैशासाठी छळ केल्याचा प्रकार घडला.
नंदिनी बावदनकर (वय २२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची बहीण पोर्णिमा नालेगावकर (वय २८, रा. औरंगाबाद) यांनी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, नंदिनी बावदनकर यांच्या मृत्यूबाबत तिची बहीण पोर्णिमा नालेगावकर यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, माझ्या बहिणीला लग्न झाल्यापासून आजपर्यंत तिचे सासरचे घरी नवरा, सासू, सासरे व नणंद, आजोबा यांनी वडिलांची शेतजमीन व घर विकून स्वतःचे नावे घर व दागिने सोडविण्यासाठी पैशाची मागणी करीत शारीरिक व मानसिक छळ करून त्रास दिला. त्यामुळे तिने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विक्रमसिंह पवार पुढील तपास करीत आहेत.
