विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद : बस आणि चालक-वाहकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : रस्ता ओलांडत असताना एक ज्येष्ठ महिला पीएमपीएमएल बसच्या मागील चाकाखाली आल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर मुख्य चौकात बुधवारी (दि.9) दुपारी पावणे चारच्या सुमारास हा अपघात झाला.
पदमा पंढरीनाथ गायकवाड (वय ७५, रा. गोल्डक्राफ्ट हाऊसिंग सोसायटी, चव्हाण चाळ, विश्रांतवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, पदमा गायकवाड या बुधवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी विश्रांतवाडी चौकाकडून भोसरीकडे जाणारी (एमएच-१२आरएन-७१०३) या बसच्या मागील चाकाखाली त्या काही अंतर फरपटत गेल्या. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. बसचालक व वाहक यांना अपघात करणाऱ्या बससह पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करीत आहेत.
