रक्षकनगरमधील घटना : चंदननगर पोलिसांत एकाच कुटुंबातील सहा जणांविरुद्ध गुन्हा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या आयटी इंजिनियर तरुणी शॉर्ट घालून फिरत असल्याच्या कारणावरुन शेजारी राहणाऱ्या महिलेने तरुणींना चपलेने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.2) रक्षकनगर मध्ये घडला.
याप्रकरणी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिला या चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रक्षकनगर परिसरात राहण्यास आहेत. त्यांच्याकडे तीन तरुणी पेईंग गेस्ट म्हणून राहतात. आयटी इंजिनिअर असलेल्या या मुली खराडी येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. दरम्यान या तरुणी अधून – मधून शॉर्ट घालून घराबाहेर जातात. या मुली शॉर्ट घालतात हे फिर्यादी यांच्या शेजारी राहणाऱ्यांना खटकत होते. याबाबत शेजाऱ्यांनी फिर्यादी यांच्याकडे विचारणा केली होती. मात्र त्यांनी काय घालावे आणि काय नाही हा त्यांचा प्रश्न असल्याचे उत्तर फिर्यादी यांनी शेजाऱ्यांना दिले. याच कारणावरुन शेजारी राहणाऱ्या एका 55 वर्षीय महिलेने फिर्यादी यांच्या घरात घुसून वाईट भाषेत शिवीगाळ केली आणि हाताने मारहाण केली. एवढेच नाही तर शॉर्ट घालून बाहेर जाणाऱ्या मुलींना देखील चपलेने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे करत आहेत.














