पोलीस आयुक्तांचा दणका : आजपर्यंत ७३ जणांना दाखवला पोलिसी खाक्या
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कात्रज आणि भारती विद्यापीठ परिसरात संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणार्या दयानंद उर्फ बापु भिमराव सितापराव (वय30, रा. निंबाळकरवस्ती, गुजरवाडी, निंबाळकरवाडी, कात्रज) याच्या टोळीविरूध्द पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. सन 2022 मधील दहावी कारवाई असून आयुक्तांनी आतापर्यंत गुन्हेगारी टोळ्यांवर ७३ मोक्क्याच्या कारवाया केल्या आहेत.
दयानंद उर्फ बापु भिमराव सितापराव याच्यासह सुमित उर्फ कुंदन भिमराव सितापराव (वय 24) आणि विकास अनिल जाधव (वय 27, रा. खोपडे नगर, गुजरवाडी रोड, कात्रज) अशी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
आरोपींविरूध्द भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये खुन, खुनाचा प्रयत्न, अपहरण, जबरी दुखापत करून दरोडा, दरोडा, दंगा, गंभीर दुखापत, मारामारी करणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी संघटितपणे दहशत निर्माण करून स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी गुन्हे केल्याचे दिसून आले आहेत. त्यामुळे भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्फत अप्पर आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे मोक्काचा प्रस्ताव पाठविला होता.
प्रस्तावाची छाननी करण्यात आली. त्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी तिन्ही आरोपींविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. मोक्क्याचा पुढील तपास सहाय्यक आयुक्त सुषमा चव्हाण करीत आहेत. दरम्यान, वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगिता यादव आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक यांनी प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविला होता. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आतापर्यंत 73 टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली असून सन 2022 मधील ही 10 वी कारवाई आहे.