निगडीतील हॉटेलमध्ये कारवाई : कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करुन खंडणीखोराचा केला पर्दाफाश
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने खंडणी उकळणार्या रॅकेटचा पर्दाफाश स्वत: पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करुन केला आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे स्वत: वेशांतर करुन निगडी येथील एका हॉटेलमध्ये गेले. त्यांनी या तोतया पोलीस अधिकार्याला खंडणीची रक्कम दिल्यानंतर तेथे असलेल्या पोलिसांनी त्याला व त्यांच्या २ महिला साथीदारांना पकडले.
रोशन बागुल असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. निगडी येथील एका हॉटेलमध्ये शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडे पोलिसांचे बनावट ओळखपत्र मिळाले आहे.
पोलिसांनी सांगितले की, रोशन बागुल हा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा मित्र असल्याचे सांगून लोकांना धमकावून खंडणी उकळत असल्याची माहिती मिळाली होती. तसेच, पोलिसांनाच तो आपण कामन करुन देऊ असे सांगून पैशांची मागणी करीत होता. याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना मिळाली. त्यानुसार कृष्ण प्रकाश यांनी त्याला निगडीतील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. वेशांतर करुन कृष्ण प्रकाश तेथे पोहचले आजूबाजूला पोलीसही साध्या वेशात अगोदर आले होते. ते रोशन बागुल याच्या समोर जाऊन बसले.
त्याला आपल्याला काम करुन घ्यायचे आहे, असे भासवले. त्यावर रोशन याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. तेव्हा पाचशे रुपयांच्या नोटांचा एक बंडल काढून त्यांनी ते रोशन याला दिले. त्याने ते घेताच कृष्ण प्रकाश यांनी आपल्या चेहर्यावरचा मास्क काढत त्याला पकडले. त्याचवेळी आजू बाजूला असलेल्या पोलिसांनी त्याला व त्याच्याबरोबर असलेल्या दोन महिलांना पकडले. ही कारवाई दस्तूरखुद्द पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि त्यांच्यासोबत गेलेल्या पथकाने केली.
रोशन बागुल हा भाड्याने एका ठिकाणी राहत होता. त्याने आपण पोलीस अधिकारी आहोत, असे सांगून धमकावुन घरमालकाकडूनही खंडणी उकळल्याचे समोर आले आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत काही पोलीस ठाण्यांमध्ये वेशांतर करुन भेटी दिल्या होत्या. आता त्यांनी वेशांतर करुन खंडणीखोराला स्वत: पकडले. या कारवाईमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.