हडपसर पोलिसांत फिर्याद : एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ दरम्यान घडला विनयभंगाचा प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिलेला गाडीतून सोडवण्याच्या बहाण्याने अश्लील बोलून तिचा विनयभंग करणाऱ्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा बु. येथील एनआयबीएम रस्ता येथील आयटी कंपनीमध्ये एप्रिल 2018 ते एप्रिल 2019 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.
धायरी येथे राहणाऱ्या ४५ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंट फिलिप जोसेफ (वय ६४, रा. कोंढवा बु.) वर गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिलेने पोलीस उपायुक्तांकडे याबाबत अर्ज केला होता. अर्जाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी व्हाईस प्रेसिडेंटवर विनयभंग आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, पीडित महिला या कंपनीमध्ये अकाउंटंट कम रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होत्या. कंपनीत काम करत असताना आरोपीने वारंवार कामामध्ये चुका कढून सर्वांसमोर अर्वाच्च आणि जातिवाचक बोलून अपमानित केले. तसेच, काम नसताना केबिनमध्ये बोलून घेऊन थांबवून ठेवले. आरोपीने ऑफिसची वेळ संपल्यानंतर देखील पीडित महिलेला ऑफिसमध्ये थांबवून त्यानंतर त्याच्या गाडीतून घरी सोडायला जात असताना अश्लील बोलून महिलेसोबत गैरवर्तन केले. याबाबत महिलेने पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी मंगळवारी (दि. 29) आरोपी फिलीप जोसेफ याच्यावर गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई करीत आहेत.
