खंडणी विरोधी पथक 1 ची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मित्राचे अपहरण करून त्यांच्या वडिलांकडे खंडणी मागणाऱ्या आरोपींना अटक करत, बालाजीनगर धनकवडी इथे लॉजवर कोंडून ठेवलेल्या अपहृत तरूणाची विरोधी पथकाने सुटका केली. या गुन्ह्यात एका विधी संघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे.
या गुन्ह्यात अभिजीत थोरात, वय 20 रा. कर्जत, अहमदनगर, निखिल कांबळे, वय 31, रा. कात्रज, पुणे तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालकासह तिघांना अटक कऱण्यात आली. अधिक चौकशी करता फिर्यादी व आरोपी एकमेकांना ओळखत असल्याचे निदर्शनास आले. आरोपींनी फिर्यादीला 29 जून पासून कात्रज, धनकवडी परिसरात वेगवेगळ्या लॉजवर डांबून ठेवले होते. आरोपी आणि त्यांचे साथीदार यांनी अपहृत तरूणाचे हातपाय बांधून फिर्यादीला हाताने, लाकडी काठीने मारहाण केली. तसेच फिर्यादी आणि कुटुंबातील इतर लोकांना ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादीच्या वडिलांकडे अडीच लाख रूपयांची खंडणी मागितली. आरोपींवर सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी अभिजीत थोरात, निखिल कांबळे यांना अटक करण्यात आली आहे.
अटकेतल्या आरोपींनी फिर्यादीच्या ओळखीच्या व्यक्तिला नोकरीला लावण्यासाठी अडीच-तीन लाख रूपये दिल्याचे प्राथमिक तपासात समजले. यामध्ये त्यांची फसवणूक झाल्याने आरोपींनी फिर्यादीचे अपहरण करून खंडणी मागितल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.
वरील कारवाई पुणे शहर पोलिस आयुक्त रितेशकुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उप आयुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने केली. या कारवाईमध्ये गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, प्रताप मानकर, सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलिस अंमलदार सचिन अहिवळे, प्रवीण ढमाळ, सुरेंद्र जगदाळे, सैदोबा भोजराव, राजेंद्र लांडगे, अमर पवार पवन भोसले, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, विजय कांबळे यांचा सहभाग होता.