दोघे लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात : एक जण पॅरोलवर सुटलेला जन्मठेपेचा कैदी
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोघा सराईत गुन्हेगारांस गुन्हे शाखा युनिट सहाने जेरबंद करून लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले असून, त्यातील एक जण पॅरोलवर सुटलेला जन्मठेपेचा कैदी आहे.
लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये एका दाखल गुन्ह्याचा गुन्हे शाखा, युनिट सहामार्फत समांतर तपास सुरू असताना पोलीस शिपाई व्यवहारे आणि ताकवणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत गुन्ह्यातील मुख्य आरोपी संतोष उर्फ गट्टया आव्हाळे हा सरडेमळा, लोणीकंद येथे येणार आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाली. सदरची माहिती पोलीस निरीक्षक गणेश माने यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील व पथक यांनी सरडेमळा, लोणीकंद येथे जाऊन सापळा रचून शिताफीने आरोपी नामे संतोष उर्फ गट्टया तुकाराम आव्हाळे (वय ३६, रिक्षाचालक, रा. आव्हाळवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यास त्याच्यासोबत असणारा इसम नवनाथ दादाभाऊ गावडे (वय ३५, रा. वाडेबोल्हाई, ता. हवेली, जि. पुणे) याच्यासह ताब्यात घेतले.
आरोपी संतोष उर्फ गट्टया आव्हाळे याच्याकडे चौकशी केली असता त्याने जुन्या भांडणाच्या वादातून नमूद गुन्ह्यातील फिर्यादी अक्षय कावडे यास जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याचा साथीदार नवनाथ गावडे असे दोघांनी मिळून कोयत्याने वार केल्याचे सांगितले. दोघांनी मिळून वर नमूद गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन पुढील तपासकामी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या गुन्ह्यातील आरोपी नवनाथ दादाभाऊ गावडे यास यापूर्वी लोणीकंद पोलीस स्टेशन कडील २०१० सालातील खुनाच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, तो कोरोना काळामध्ये पॅरोल रजेवर बाहेर आलेला आहे.
सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट सहाचे पोलीस निरीक्षक, गणेश माने, सहपोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, संजीव कळंबे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, नितीन शिंदे, प्रतीक लाहिगुडे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली आहे.
