मांजरी बुद्रुकमधील घटना : सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला ३१ लाख २५ हजार रुपयांना गंडा
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
बांधकाम व्यवसायात भागीदारी देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. बांधकाम व्यावसायिकाने एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची 31 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी रामपलट पुरुषोत्तम राम (वय-62 रा. से.नं. 142/1, वृंदावन सोसायटी, घावटेनगर, मांजरी बु.) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष पोपट चव्हाण (रा. फ्लॅट नं. 301, चिंतामणी हौसिंग सोसायटी, मांजरी बु.) या बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, संतोष चव्हाण बांधकाम व्यावसायिक आहेत. चव्हाण आणि फिर्यादी यांची 2018 मध्ये एका बांधकामाच्या ठिकाणी ओळख झाली होती. संतोष चव्हाण यांनी फिर्यादीला बांधकाम साईटमध्ये भागीदारी देण्याचे आमिष दाखवून 31 लाख 25 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर कोणताही करारनामा न करता फिर्यादी यांची फसवणूक केली. रामपलट राम यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करुन संतोष चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर करीत आहेत.
