ज्वारीला फायदा : पावसाच्या शक्यतेने तूर काढणी, मळणीसाठी धावपळ
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अनिल डुंगरवाल
पारगाव: या भागात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी हंगामातील कांदा, हरभरा, गहू, पिकाला याचा मोठा फटका बसत आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम प्रत्यक्ष उत्पन्नावर होणार आहे.
दरम्यान, हे ढगाळ वातावरण ज्वारी पिकासाठी मात्र पोषक असल्याचे शेतकरी सांगत असले तरी कांदा, गहू, हरभरा पिकाच्या तुलनेत ज्वारीचा पेरा कमी असल्याने शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम धोक्यात सापडला आहे.पारगाव शिवाराचे एकूण क्षेत्र १७६१ हेक्टर असून, यापैकी १६९१ हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे. यातील रब्बी हंगामात १३३० हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे. यात सर्वाधिक १ हजार ११० हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा आहे. त्याखालोखाल ज्वारी १६० हेक्टर, कांदा ३० हेक्टर तर गव्हाचा पेरा ३० हेक्टर क्षेत्रावर झाला असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. उर्वरित ३६१ क्षेत्र ऊस, तूर यासह फळबाग लागवडीखाली आहे. सध्या बदललेल्या हवामानाचा फटका नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरभरा पिकाला बसत आहे. या आधीच हरभरा पिकावर आळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने हरभरा पीक खुरटे झाले होते. मात्र, गेल्या पंधरा दिवसापासून थंडी वाढली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी फवारणी केल्याने आळीवर नियंत्रण ठेवण्यात यश आले होते. त्यामुळे पिकाची वाढही चांगली झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने हरभरा पिकाला फटका बसत आहे. शिवाय गहू पिकावरही तांबोरा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्वारीला मात्र हे वातावरण पोषक असल्याचे काही शेतकरी सांगत आहेत. दरम्यान, ढगाळ वातावरणासोबतच या भागातून अधूनमधून पावसाचे चित्रही निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकरी तूर काढणीच्या व मळणीसाठी धावपळ करताना दिसत आहेत.
