महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रमाळ
बार्शी : अगदी उद्योगपती रतन टाटा, अभिनेते सुनील दत्त, शरद पवार पासून ते बार्शीतील दातृत्वशील व्यक्ती संस्था यांच्या योगदानातून उभारलेले कॅन्सर हॉस्पिटल ही बार्शीची अस्मिता आहे असे प्रतिपादन माजी मंत्री दिलीप सोपल यांनी केले.
ते कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या डेक्सा स्कॅनिंग मशीन व भारतीय आरोग्य जीवन शैली आणि प्रौढत्व अभ्यास प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी ऑक्सफॉर्डच्या डॉ साराह लेविंगटन, ब्रिस्टोल मेडिकल स्कुलचे प्रोफेसर जॉर्ज डेव्हीस्मित, टाटा मेमोरीयल चे संचालक डॉ राजेश दीक्षित, डॉ शरयू म्हात्रे, बार्शी कॅन्सर हॉस्पिटल चे सचिव सत्यनारायण झंवर, संचालक मनिष चौहान, वर्षा झाडबुके, किशोर परांजपे, आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डाक्स स्कॅनिंग मशीनचे उदघाटन झाले. दिलीप सोपल पुढे म्हणाले की, बार्शी कॅन्सर हॉस्पिटल मधील संशोधनामुळे आज जगाच्या वैद्यकीय क्षेत्रात बार्शीचे नावं झाले आहे. बार्शी बरोबरच इतर चार पाच जिल्ह्यातील रुग्णांना आता सर्व तपासणी व उपचारासाठी मोठया शहरात जाण्याची गरज नाही त्यामुळे पैसे आणि वेळेची बचत होणार आहे असे सांगत आजपर्यंत दान देणगी देणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी साराह लेविंगटन, जॉर्ज डेव्हीस्मित यांनी इंग्रजी मध्ये केलेल्या भाषणाचे मराठी मध्ये भाषांतर करून सांगण्यात आले. प्रास्ताविक नंदकुमार पानसे यांनी केले तर आभार मानसी थळकरी यांनी मानले.















