महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : स्त्रियांनी स्वतःचं आयुष्य स्त्री म्हणून जगलं पाहिजे, समाजात वावरलं पाहिजे, यासाठी मकर संक्रांतीच्या सणाला सकाळ तनिष्का प्रतिष्ठानने विधवा स्त्रियांसाठी हळदी-कुंकूंचा उपक्रम राबविला.
मकर संक्रांतीच्या सणाला स्त्रियांसाठी हळदी कुंकूंचा कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र, स्त्रियांसाठीच्या या कार्यक्रमात ‘विधवा’ स्त्रियांना टाळले जाते. सुवासिनी म्हणून ज्या स्त्रियांना मानले जाते. त्याच स्त्रियांना अशा कार्यक्रमांना बोलावले जाते. मात्र, बार्शीत सकाळ तनिष्का महिला प्रतिष्ठानच्या वतीने विधवा महिलांनाही हळदी – कुंकूंवाच्या कार्यक्रमात सन्मान देण्यात आला. रूढी-परंपरेच्या बंधनातून या विधवा स्त्रियांना मुक्त करण्यात आले.’विधवा नव्हे स्त्री मी…’ हा जगण्याचा मंत्र या कार्यक्रमाने दिला. विधवा स्त्रियांच्या बाबतीत भेदभाव केला जातो. विधवा स्त्रियांच्या हातून औक्षण करून घेणे अपशकून मानले जाते. शुभ व धार्मिक कार्यक्रमात विधवा स्त्रियांना निमंत्रण नसते. त्यामुळे, विधवा स्त्रियांमध्येही भेदभावाची, वाळीत टाकल्याची भावना निर्माण होते. पतीसोबतच आपलेही आयुष्य नरक यातनेत गेल्याची धारणा तयार होते. त्यातून या स्त्रिया स्वतःच्या राहणीमानाचा विचार करत नाहीत. नीटनेटके राहत नाहीत. उर्वरित आयुष्य निराशेत ढकलतात. मात्र, अशा उपक्रमांमुळे या स्त्रियांच्या आयुष्यात जगण्याची नवी उमेद तयार होते. त्यांचे नैराश्य कमी होण्यास मदत होईल, असे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अपर्णा शिराळ यांनी म्हटले.’ विधवा नव्हे स्त्री मी’ या उपक्रमासाठी डॉ. वंदना यादव आणि सुजाता अंधारे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तर, या कार्यक्रमासाठी विधवा महिलांना आरती जाधव यांनी धाडस देत प्रेरित केले. यावेळी, महिलांना वाण गुलाब हळदी-कुंकूं तिळगुळ देण्यात आले. अपर्णा शिराळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.















