महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
नगर : आळंदी (ता. खेड) येथील डॉ. नारायण महाराज जाधव यांना २०२३ चा राज्य सरकारचा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचा नगरमधील गांधी क्रिएशनच्या गांधी परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी विलास जाधव, सुभाष भंडारी, राजेंद्र गांधी, महेश मुनोत, सचिन भंडारी, शेखर भंडारी, निखिल गांधी आदी उपस्थित होते. गांधी परिवाराच्या वतीने डॉ. जाधव महाराज यांना सन्मानपत्र देण्यात आले. डॉ. जाधव मुळचे नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील रहिवाशी आहेत.
घरात वारकरी संप्रदायाचा वारसा असल्याने त्यांची पावले आळंदीकडे अध्ययनासाठी वळाली. येथे आल्यानंतर सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत संत साहित्याचा अभ्यास सुरू केला. आळंदीतील गोपाळपुरा येथे केवल्य आश्रमामधील आनंदस्वामी ऊर्फ दन्तेस्वामी यांच्याकडे बरेच वर्षे राहून वारकरी पद्धतीचे शिक्षण घेतले.
एकनाथी भागवत, विचारसागर, ज्ञानेश्वरी, वृत्तीप्रभाकर, पंचदशी अशा अनेक ग्रंथांवर त्यांचे प्रभुत्व आहे. त्यांनी वारकरी शिक्षण देणारी संस्था आळंदीत उभी करून शेकडो कीर्तनकार, प्रवचनकार, साधकांना घडविण्याचे काम केले आहे.
जाधव महाराज यांनी भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृत विषय घेऊन पुणे विद्यापिठातून एम. ए. पदवी मिळविली. ‘बीएएमएस’ शिक्षण घेतले. ते व्यवसायाने आयुर्वेद डॉक्टर होते.त्यांनी नगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर येथे वैद्यकीय निःशुल्क सेवा केली आहे. महाराजांची कृपाशीर्वाद आणि शुभेच्छा गांधी परिवाराला कायम लाभल्या आहेत, अशा भावना राजेंद्र गांधी यांनी व्यक्त केल्या.