सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मुलाला केली अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : आई व वडिलांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या मुलास अटक करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.
समाधान कुंभार (रा. मौजे पाचेगाव (बु), ता. सांगोला) याला पोलिसांनी अटक केली आहे. मौजे पाचेगाव (बु), ता. सांगोला, येथे राहणारे भिमराव कुंभार, (वय ७० वर्ष) व त्यांची पत्नी सुशिला कुंभार, (वय ६५ वर्षे) हे त्यांचा मुलगा पांडूरंग कुंभार यांच्या घरामध्ये दोघेच राहत होते.
दिनांक १ मार्च रोजी सायंकाळी ७.०० च्या दरम्यान घराच्या गच्चीवर भिमराव कुंभार आणि सुशिला कुंभार यांचा खून केल्याचे आढळून आले. सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्यामध्ये दोघांचा खून झाल्याने सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम बावलकर यांनी भेट दिली. सोलापूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुरेश निबाळकर व पथकास यांना मार्गदर्शन केले.
निंबाळकर व पथकाने पाचेगाव येथे २ दिवस थांबून मयताची कौटुंबीक परिस्थिती, त्यांची मुले त्यांच्यामध्ये असलेल्या वादाबाबत अधिक माहिती काढली होती. पोलीस तपासात मोठ्या मुलानेच खून केल्याचे कबूल केले आहे. मोठ्या मुलास अटक करण्यात आलेली असून पुढील तपास सांगोला पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर अर्जुन भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली इसाक मुजावर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, हरिदास पांढरे, अक्षय दळवी, समरी शेख, राजेंद्र गवेकर सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण तसेच पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे, व गणेश कुलकर्णी सांगोला पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे.















