महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत भूम तालुक्यातील विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या अनुषंगाने ६ मार्च रोजी भूम येथील आठवडी बाजार झोलापूर मारुती जवळ एक दिवसीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
आदिवासी पारधी, विमुक्त जाती-जमाती, वडर, कैकाडी, मसान जोगी, डवरी सापवाले, घिसाडी, कोल्हाटी, कुरमुऱ्या वाले व भटक्या समाजाच्या लाभार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र देणे, रेशन कार्ड, मतदार यादी त्यांचे नाव नोंद करून घेणे, आधार नोंदणीकरण करणे, संजय गांधी योजना श्रावणबाळ योजनेचा लाभ देणे यासह विविध योजनाची माहिती करून देण्यात आली.
शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यत शासकीय योजना पोहचविण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील असून शेवटच्या नागरिकाला विविध योजनांचा लाभ मिळेपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या एकदिवसीय उपक्रमामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र ७, जात प्रमाणपत्र ४, जन्म नोंदी लावणे १७, शिधापत्रिका मध्ये नाव समाविष्ट करणे ५, नवीन शिधापत्रिका वितरण ३, आधार कार्ड अपडेट करणे, नावात दुरुस्ती करून प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.दरम्यान तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध प्रमाणपत्रे काढून घेतली.
जोपर्यंत तालुक्यातील गरिबांचे कल्याण होणार नाही, तोपर्यंत विकास शक्य नाही. शासकीय योजनांचा लाभ आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन तहसीलदार जयंत पाटिल यांनी ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. यावेळी तहसीलदार जयंत पाटील, नायब तहसीलदार हरिचंद्र पवार, पेशकार जिकरे, उपस्थित होते.
