तपास अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यास टाळाटाळ
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : येथील अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू इत्यादीच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेत सर्वात मोठा छापा टाकलाआहे. उत्तर कसब्यातील या धाडीत हजारोंचा प्रतिबंधीत माल हस्तगत करण्यात आला आहे.
याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आरोपी प्रशांत सिध्देश्वर तरटपट्टे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘रॉंग नंबर’ म्हणून कारवाईची माहिती देण्याचे टाळले.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी, १८ मार्च रोजी दुपारी टाकलेल्या छाप्यात उत्तर कसब्यातील के एस पान टपरी मधून २२ डब्बे बाबा सुगंधित तंबाखु, १.५ डब्बा रजनीगंधा पानमसाला, ४१ पाकीटे हिरवा गोवा, २४ पाकिटे व्हि १ सुगंधित तंबाखू, २४ पाकिटे विमल पानमसाला, ०२ पाकिटे हाय गुटखा, १ बॉक्स एम सुगंधित तंबाखू असा ४९,९६५ रुपयांचा प्रतिबंधित माल हस्तगत करण्यात आला आहे.
याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षक रेणुका रमेश पाटील (अन्न व औषध प्रशासन म. राज्य, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्यानुसार फौजदार चावडी पोलिसांनी आरोपी प्रशांत सिध्देश्वर तरटपट्टे (वय ४२ वर्षे, रा. उंबरजकर वस्ती, निराळे वस्ती जवळ, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अधिक तपासासाठी गुन्हे शाखेचे सपोनि पाटील यांच्याकडे देण्यात आला.
