महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मुळे नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध टाकण्यात आले आहेत.
नमुना पत्रिका छपाईस निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच ६ जून २०२४ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात निर्बंध घालण्यात येत आहेत. असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे.
त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण पक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधीने अथवा त्यांच्या हितचिंतकाने मुद्रणालयाच्या मालकाने व इतर सर्व माध्यमांद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापताना इतर उमेदवाराचे नाव व त्यांना नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे, आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे आदी बाबींवर निर्बंध घालण्यात येत आहेत.
