महिलेला ९३ लाखांचा गंडा, आरोपी गजाआड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : उद्योगपती मालपाणी कुटुंबाचा सदस्य असल्याचे भासवून नवी मुंबई येथील एका महिलेची ९३ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपीने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढून फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
बनावट फोटोच्या आधारे महिलेकडुन खंडणी उकळणाऱ्या आरोपीला अटक करुन ३४ तोळे सोन्याचे दागिने निगडी पोलिसांनी जप्त केले. आरोपीकडे केलेल्या तपासात त्याने वरील माहिती दिली. सुरज लक्ष्मण परमार उर्फ सुरज जैन उर्फ सुरेश भिवशी कदम उर्फ द्रिश मालपाणी (वय-28 सध्या रा. संकेत पार्क, सय्यदनगर, पुणे मुळ रा. महाविर कॉलनी, विजापुर, कर्नाटक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेला सुरज जैन नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पावून तीला एका मोठ्या उद्योगपती घराण्यातील मुलगा असल्याचे भासवले. महिलेसोबत मैत्री करुन तिला बाहेर भेटण्यास बोलावून एकत्र फोटो काढले. त्यानंतर फोटो आक्षेपार्हरित्या मॉर्फ करुन ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी महिलेला दिली.
तिच्याकडून ३४ तोळे सोन्याचे दागिने घेतले. त्यानंतर पुन्हा दागिन्यांची मागणी त्याने केली. मोबाईलमध्ये महिलेचे बनावट फेसबुक अकाउंट उघडले. या अकाउंटवर दोघांचे एकत्र असलेले फोटो पोस्ट करुन महिलेची बदनामी केली.
महिलेने तक्रार देताच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. ३४ तोळ्याचे दागिने व महिलेचे मॉर्फ केलेले फोटो जप्त केले. आरोपीकडे केलेल्या तपासात त्याने अशा प्रकारे अनेक महिलांना फसवल्याचे समोर आले.
त्याने यापुर्वी द्रिश मालपाणी या नावाने तो संगमनेर येथील मालपाणी कुटुंबातील सदस्य असल्याचे भासवून नवी मुंबईतील एका महिलेची ९३ लाखांची फसवणूक केली. याबाबत तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच त्याला दत्तक घेणाऱ्या सोलापूर येथील एका महिलेचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
