ग्रामीण पोलिस अधिक्षकांचा इशारा, उद्योजकांना दिला दिलासा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : उत्सव, सण, पुण्यतिथी व जयंतीच्या नावाखाली जबरदस्तीने वर्गणी मागणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे असतानाही कुणी जबरदस्ती वर्गणी वसूल करण्यास आले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ए सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिला आहे.
एम.आय.डी.सी चिंचोली येथे कार्यरत असलेल्या उद्योजकांकडून सण, उत्सव व जयंतीच्या नावाखाली जबरदस्तीने वसुल केली जाणारी वर्गणी थांबवा अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही कठोर भूमिका जाहीर करून उद्योजकांना दिलासा दिला आहे.
एम.आय.डी.सी चिंचोली येथील कार्यरत असलेल्या उद्योजकांकडून सण, उत्सव पुण्यतिथी व जयंती दरम्यान जबरदस्तीने वसुल करण्यात येत असलेल्या वर्गणीच्या अनुषंगाने ही ग्रामीण पोलीस मुख्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व उद्योजकांनी जबरदस्तीने वसुल करण्यात येत असलेल्या वर्गणीबाबत नाराजी व्यक्त केली. त्यांच्या व्यथा मांडल्या.
कंपनीचे कामकाज करीत असताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. यावेळी सरदेशपांडे यांनी सांगितले, यापुढे कोणीही आपले कंपनीत जबरदस्तीने वर्गणी मागणे करीता आल्यास तेंव्हा त्वरीत मोहोळ पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेल्या एम.आय.डी.सी. पोलीस चौकीस व सोलापूर तालुका, पोलीस ठाणेस संपर्क साधावा. १२२ क्रमांकावर कॉल करून माहिती दयावी.
उद्योजकांना पोलीस विभागाकडून लगेच मदत मिळावी या करीता संबंधीत पोलीस ठाणेचे अधिकारी व उद्योजक यांचा व्हॉटसअप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या पुढे कोणीही कंपनीमध्ये विनापरवाना जबरदस्तीने प्रवेश करून सण, उत्सव व जयंतीच्या नावा खाली वर्गणी वसुल करणे करीता प्रवेश केला अगर प्रयत्न केल्यास अशा संबंधीत व्यक्ती विरूध्द पोलीस विभागाकडुन योग्य ती कठोर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
या बैठकीस अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग संकेत देवळेकर, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहायक पोलीस निरीक्षक फाळके व एम.आय.डी.सी चिंचोली येथे कार्यरत असलेले उद्योजक उपस्थित होते.