महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : घेरा सिंहगड भागातील मोरदरी संरक्षित वनक्षेत्रात चंदनाची झाडे तोडणाऱ्या तिघांना वन विभागाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८० किलो चंदन ताब्यात घेण्यात आले आहे.
वन विभागातर्फे आरोपींवर अवैध वृक्षतोड केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येणार आहे. चंदनचोरीप्रकरणी किरण शिंदे (रा. पाडेगाव, लोणंद), राहुल पवार (रा. भिगवण) आणि रोहित काळे (रा. कर्जत) यांना अटक करण्यात आली आहे. सचिन शिंदे (रा. पाडेगाव, लोणंद) हा आरोपी फरारी झाला आहे.
उप वनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक दीपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, वनपाल समाधान पाटील आणि घेरा सिंहगड संयुक्त वन व्यवस्थापन समितीने ही कारवाई केली.
पुणे परिसरात अनेक शासकीय कार्यालयाच्या परिसरातही चंदनाची झाडे आहेत. अधून मधून चोरीच्या घटना घडत असतात, बाजारात चंदनाच्या लाकडाला मोठी किंमत मिळत असते.














