महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे शहर व जिल्ह्यात बंदी असलेला गुटखा व सुगंधित सुपारीच्या पुरवठा केल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी गुटखा पुरवठादारास अटक केली.
त्याच्याकडे असलेला ८० हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज शेडगे यांनी सांगितले की, पोलिसांना माहिती मिळाली होती की, एक जण गुटखा पुरवठा करण्यासाठी वारजे परिसरात येणार आहे.
त्यानुसार पोलिसांनी वारजेतील सेवा रस्त्यावर साई सयाजीनगर येथे सापळा रचला. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास एक इसम पांढऱ्या रंगातील दोन पोत्यांमध्ये काहीतरी घेऊन जात असल्याचे आढळला.
पोलिसांना त्याची दुचाकी थांबवून त्याच्याकडील साहित्य तपासले असता त्यात बंदी असलेले गुटखा व सुगंधित ‘सुपारी व इतर पदार्थ सापडले. पुरवठादार जीवन मनोहर नेमाने (वय ३९, रा. वारजे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज शेंडगे तपास करीत आहेत. गेल्या काही दिवसात वारजे, धायरी परिसरात मोठ्या प्रमाणात गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे.
