सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून चार जणांच्या टोळक्याने एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन डोक्यात तलवारीने वार करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.27) मध्यरात्री एकच्या सुमारास बिबवेवाडी येथील गंगाधाम रोडवर घडली आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.
रोहित उर्फ बाळ्या सुनिल थोरात (वय-19 रा. लोहिया नगर, सी.पी. गंजपेठ, पुणे) याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन आफ्रिदी हुसेन शेख (रा. काकडे वस्ती, कोंढवा), एजाज शेख (रा. लोहियानगर,पुणे) यांना अटक केली आहे. तर सादीक शेख (रा. लोहियानगर, पुणे), उमेश भंडारी (रा. काकडे वस्ती, कोंढवा) यांच्यावर (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी आफ्रिदी शेख हा पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ आणि आरोपी यांच्यात पूर्वी वाद झाले होते.
त्यामुळे जखमी रोहितच्या भावाने आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याचा राग आरोपींच्या मनात होता. गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास रोहित त्याच्या दुचाकी गाडीवरुन गंगाधाम रोडवरुन मार्केटयार्ड कडे जात होता. त्यावेळी आरोपींनी त्याची दुचाकी अडवली.
तुझ्या भावाने माझ्या विरोधात पोलिसांत तक्रार का दिली असे म्हणून आरोपीने धारदार तलवारीने रोहितच्या डोक्यात वार केला. तसेच इतर आरोपींनी दगड, बाटलीने डोक्यात मारुन रोहित याला गंभीर जखमी केले. रोहित याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ करुन आरोपी तिथून पसार झाले.
रोहित याने दिलेल्या तक्रारीवरुन बिबवेवाडी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे करीत आहेत.
