धारीवाल इंग्रजी शाळेतील गुणवंत विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरण
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती जपावी, आपले संस्कार आणि नीतिमूल्ये यांचे कायम जतन करावे. कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये. त्यापेक्षा निसर्ग प्रेमी व्हा, आज काल विद्यार्थी दशेतच अनेक मुलं व्यसनाधीन होत आहेत. त्यावर शिक्षकांनी, पालकांनी व समाजातील प्रत्येक घटकाने लक्ष घालणे गरजेचे आहे असे मत आरएमडी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर. धारीवाल यांनी व्यक्त केले.
श्री रसिकलाल मा. धारीवाल इंग्रजी शाळा कोंढवा येथे विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील दहावी बारावीत गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या वेळी त्या बोलत होत्या.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आर. एम. डी. इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याची परंपराम कायम ठेवली आहे. आर. एम. डी. फाऊंडेशनद्वारा या शाळेस देण्यात आलेल्या स्मार्ट पॅनल बोर्ड तसेच आधुनिक संगणक लॅबचे उदघाटन शोभाताई धारीवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
२००१ साली एका छोट्याशा खोलीत २ विद्यार्थ्यांना घेऊन सुरु केलेल्या या शाळेत आज नर्सरी ते १२ वी पर्यंत विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील १६५० विध्यार्थी शिकत आहेत. एका रोपट्याचा आज वटवृक्ष झालेला आहे अशी भावना शोभाताईंनी यावेळी व्यक्त केली.
आरएमडी फाऊंडेशन द्वारा गुणवत्ता धारक विध्यार्थ्यांना व शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना पक्षांच्या खाद्याचे घरटे भेट म्हणून देण्यात आले. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण उपस्थितांच्या हस्ते पार पडले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त पोपटलाल ओस्तवाल, ललित ओस्तवाल व संस्थेचे इतर सर्व विश्वस्त, शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती बहुलेकर, उपमुख्याध्यापिका संध्या नाडगौडा, ज्ञानेश्वर देशमुख, शाळेचे शिक्षक वृंद तथा शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.















