बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : दोन लाखाचे दागिने जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : घरकाम करणाऱ्या महिलांना काम देण्याचे बहाण्याने चहा मधून गुंगीचे औषध देवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगार महिलेस व तिच्या साथीदारास बिबवेवाडी पोलीसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १२ जून रोजी दुपारी १२.३० वा ते रात्री १०.३० वा च्या दरम्यान एका अनोळखी महिलेने भारत ज्योती बसस्टॉप बिबवेवाडी येथे फिर्यादी यांना भेटून त्यांना काम देण्याचा बहाणा करुन त्यांना लक्ष्मी रोड येथे घेवुन जावुन तिथुन तिचे घरी नेवुन फिर्यादी यांना चहामधुन गुंगीकारक पदार्थ देवुन बेशुद्ध करुन त्यांचे अंगावरील सोन्याचे दागीने व मोबाईल हे जबदस्तीने काढून घेवून त्याना फुरसुंगी येथे बेशुध्द अवस्थेत सोडून दिले होते.
तसेच साक्षीदार महिला यांना सुध्दा अनोळखी महिलेने काम देते असे सांगून स्कुटीवरून घरी नेवून चहा मधून गुंगीकारक पदार्थ देवून त्यांचे गळयातील व कानातील सोन्याचे दागिने काढून घेवून त्यांना कर्वेनगर पुणे येथे बेशुध्द अवस्थेत सोडून दिले म्हणून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयातील अनोळखी महिला आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे, यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथक प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, तपास पथकातील अमंलदार यांनी शोध घेतला.
गुन्हयाचे घटना ठिकाणापासून ते अनोळखी आरोपी गेलेल्या मार्गावरील अंदाजे ५० ते ६० सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने सुषमा बाळासो भोसले (रा. माळेगाव बुद्रुक बारामती जि.पुणे) विकास वासूदेव पाठक, (वय ५८ वर्षे रा. एलआयसी स्टाफ क्वार्टर गणेशखिंड रोड मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे. मुळ नाईकवडी प्लॉट परांडा रोड, बार्शी) यांना ताब्यात घेतले आहे.
दोन्ही आरोपीकडे तपास करून गुन्हयातील २,०४,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने, मोटर सायकल, मोबाईल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे. असा प्रकार कोणासोबत घडलेला असल्यास त्यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहन गुन्हयाचा सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे यांनी केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त आर राजा, सहा. पोलीस आयुक्त गणेश इंगळे, वानवडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस हवालदार संजय गायकवाड, शाम लोहोमकर, संतोष जाधव, पोलीस अमंलदार शिवाजी येवले, प्रणय पाटील, विशाल जाधव, आशिष गायकवाड, ज्योतिष काळे, अभिषेक धुमाळ, मेघा गायकवाड यांनी केली आहे.

 
			


















