जयराज समूह आयोजित ‘उद्बोधन’ या कार्यक्रमात मार्गदर्शन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : “आत्मशुद्धी हा मुक्तीचा मार्ग आहे आणि एक सर्वसामान्य माणूसही आत्मशुद्धीतून शाश्वत सुख आणि केवलज्ञान प्राप्ती करू शकतो, असा संदेश आणि त्यासाठीचा मार्ग भगवान महावीर यांनी दिला,” असे प्रतिपादन वीरायतन या संस्थेच्या संस्थापिका पद्मश्री आचार्य चंदनाजी तथा ताई माँ यांनी केले.
पुण्यातील जयराज समूहाने आयोजित केलेल्या ‘उद्बोधन’ या कार्यक्रमात ‘मनुष्य जीवनाची क्षमता’ या विषयावर ताई माँ बोलत होत्या. “आसक्तीपासून दूर ठेवणारे शिस्तबद्ध आयुष्य जगणे हा मुक्तीचा मार्ग होऊ शकतो. ते आपल्या कोणालाही साध्य असल्याने प्रत्येक माणूस आदर-सत्काराला पात्र असतो,” असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जयराज समूहाच्या वतीने राजेश शहा यांनी सर्वांचे स्वागत केले. याप्रसंगी साध्वी श्री शिलापीजी यांचे प्रवचन आणि साध्वी श्री संघमित्राजी यांचे भजन यांबरोबरच जय जैन यांचा अवधानाचा कार्यक्रमही सादर करण्यात आला. जयराज समूहाचे जयंत व मालव शहा यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला.
