महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील डाळज नं. १ हद्दीत कार चालकाचा ताबा सुटुन झालेल्या अपघातात फिरण्यासाठी गेलेल्या तेलंगणातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मंगळवारी सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हे सर्वजण तेलंगणा राज्यातील असल्याची माहिती मिळत असून, हा अपघात एवढा भीषण होता की, चारचाकी गाडीने तीन-चार पलट्या मारल्या.
रफिक कुरेशी (वय ३४), इरफान पटेल (२४), मेहबूब कुरेशी (२४),फिरोज कुरेशी (२८), फिरोज कुरेशी (२७, सर्व रा. नारायणखेड, ता.जि. मेडकं, तेलंगणा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या पाच जणांची नावे आहेत.
तर सय्यद इस्माईल अमीर (२३) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर भिगवण या ठिकाणी उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील नारायनखेड (जिल्हा-मेडक) या गावातील सहा तरुण मुंबईला फिरायला गेले होते.
मुंबई फिरून झाल्यानंतर परत आपल्या नारायणखेड या गावी निघाले होते. जोरदार पावसामुळे डाळजच्या हद्दीतील सुजाता पेट्रोलपंपाच्या समोर रस्त्यालगत साचलेल्या पाण्याच्या खड्याचा अंदाज न आल्याने वेगाने असणारी कार खड्ड्यात जोरात आदळली.
कार खड्यात आदळल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व गाडीने तब्बल तीन-चार पलट्या मारल्या. यामध्ये गाडीत असलेल्या पांच जणांचा जागीच मृत्यू झाला.
तर एकावर भिगवण येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती समजताच डाळज महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन अपघातातील जखमींना व ठार झालेल्यांचे मृतदेह बाहेर काढले.















