महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नेहमीच गजबजलेल्या कात्रज येथील पी.म. पी. बस स्थानकावर गर्दीत प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना भारती विद्यापिठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कात्रजच्या बसस्टाॅप वर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. बसमध्ये चढताना मोबाईल चोरी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी करडी नजर ठेवली होती. कात्रज मधीलच एका तरुणाने ५ जुलै रोजी सकाळी त्याचा मोबाईल चोरीस गेल्याने तक्रार दाखल केली आहे.
यातील फिर्यादी हे बसमध्ये चढत असताना त्याच्या पाठीमागून आलेल्या दोन इसमा पैकी एकाने ढकला-ढकली करुन फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशामध्ये हात घालून त्यांचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला व दुसऱ्या चोरट्याने फिर्यादी यांच्या पुढे बस मध्ये चढत असलेल्या दुसऱ्या प्रवाशाच्या पॅन्टच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने काढुन घेतला.
पोलिसांनी तातडीने हालचाल करीत दोघांनाही ताब्यात घेतले. शामकुमार शिवा व्यंकटेश (वय ३१ वर्षे, रा. आंबेडकर कॉलनी नं. ४ ता. हरीमनगर, जि. निजामाबाद हैद्राबाद) राजकुमार कृष्णकुमार (वय १९ वर्षे, रा. उप्प गांधीनगर, विनायक मंदिराशेजारी हैद्राबाद) यांना अटक करण्यात आली आहे. हा तपास पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता करीत आहेत.
