स्वारगेट पोलिसांनी घेतले ताब्यात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : काहीच काम करीत नसल्याने कुटुंबीय आणि शेजारी सतत टोमणे मारत असल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने महर्षीनगर परिसरात वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे घडला.
या प्रकरणी लक्ष्मण अधिकारी (वय ३६) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून स्वारगेट पोलिस ठाण्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाचे आई-वडील मोलमजुरी करतात.
तो मुलगा काम करीत नव्हता. त्यामुळे त्याचे कुटुंबीयत्याला ‘कामधंदा कर,’ असे सांगत होते. शेजारीदेखील त्याला कामावरून बोलत असत. त्यामुळे तो तणावात आला आणि त्याने मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास तो दारूच्या नशेत महर्षीनगर परिसरात आला.
त्याने दगडाने रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या. यावेळी तक्रारदार कामावर जात असताना त्यांची सायकल अडवून त्यांच्या खिशातील पाचशे रुपये जबरदस्तीने काढून घेत लुटले.
त्यानंतर तो पसार झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने घरचे काम करीत नाही म्हणून बोलतात. शेजारी टोमणे मारतात; म्हणून हे कृत्य केल्याची माहिती दिली आहे. स्वारगेट पोलीस करीत आहेत.
