विमल बाफना यांचा अनोखा उपक्रम : पर्यावरण जागृतीसाठी अभियान
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : जैन कॉन्फरन्सच्या माजी राष्ट्रीय महिला अध्यक्षा विमल सुदर्शन बाफना यांनी पर्यावरण जागृतीसाठी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. प्रभावना म्हणून त्यांनी प्रत्येकाला झाड देण्याचा निश्चय केला आहे.
प्रत्येक जैन स्थानकात कार्यक्रम झाल्यावर प्रभावना म्हणून काही तरी खाण्याची वस्तू देण्याची प्रथा जैन समाजात प्रचलीत आहे. तर प्रभावना म्हणून आपण लोकांना झाडे दिले तर काय होईल असा विचार त्यांनी त्यांचे पती उद्योगपती सुदर्शन बाफना यांच्या पुढे मांडला.
सुदर्शन बाफना हे देखील पर्यावरण प्रेमी आहेत, त्यांनी कसलाही विलंब न करता विमल बाफना यांच्या या अभिनव उपक्रमास पाठींबा दिला. याची सुरुवात वडगावशेरी जैन स्थांनकापासून करण्यात आली.
येथील चातुर्मास प्रवेश झाल्यावर सुमारे 600 लोकांना प्रभावना म्हणून बाफना यांच्या कडून झाडे वाटण्यात आली. याविषयी विमल बाफना यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की पर्यावरण राखले तरच आपण सर्व जण सुरक्षित राहू. झाडे लावणे ती जगवणे हे सर्वाचे कर्तव्य आहे.
प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून हा उपक्रम राबवला पाहिजे. मी हा उपक्रम सध्या पुणे शहरातील सर्व स्थानकामध्ये सुरू केला आहे. पुढील काळात याची व्याप्ती वाढवली जाणार आहे.
