लोहगाव येथील घटना : चालकाला अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अँनिमल अँब्युलन्सने धडक दिल्यामुळे एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना लोहगावात फॉरेस्ट पार्कजवळ घडली. विमानतळ पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.
सुरेंद्रसिंह शैलेंद्रसिंह कुम्पावत (वय ४८, रा. चंदननगर, खराडी) असे पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत त्यांचा लहान भाऊ महेंद्रसिंह कुम्पावत यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
चालक संजय चन्नाप्पा मुल्लोळी (वय २६, रा. वाडेबोल्हाई, डोंगरगाव रोड ता. हवेली) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १३) रात्री पावणेआठच्या सुमारास हा अपघात झाला.
सुरेंद्रसिंह लोहगावातील फॉरेस्ट पार्क परिसरात रस्ता ओलांडत होते. त्यावेळी प्राण्यांची ने-आण करणाऱ्या वाहनाने (अँनिमल अँब्युलन्स) सुरेंद्रसिंह यांना जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या सुरेंद्रसिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिस निरीक्षक (गुन्हे) सर्जेराव कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. चालक मुल्लोळी याने मद्यसेवन केल्याचे तपासणीत समोर आले आहे. आरोपीला अटक केल्याची माहिती विमानतळ पोलिसांनी दिली. हा तपास पोलीस उप निरीक्षक सी. डी. भोसले करीत आहेत.
