महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : येरवडा खुल्या कारागृहात खुनाच्या गुन्ह्याखाली जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने सुरक्षारक्षकांची नजर चुकवून शनिवारी पलायन केले. कारागृहात शोध घेऊनही तो सापडला नसल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली.
आत्माराम उर्फ आत्म्याला लाडक्या भवर (वय ३४, रा. पालघर) असे कैद्याचे नाव आहे. तुरुंग अधिकारी हेमंत पाटील यांनी तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शहापूर पोलिस ठाण्यात २००९ मध्ये भवर याच्यावर खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी २०१७ मध्ये त्याला जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंड सुनावला होता. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती.’ येरवडा खुल्या कारागृहात भवर जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.
शनिवारी काम करीत असताना भवर गायब झाला. सायंकाळी कैद्यांची मोजणी करत असताना तो दिसून आला नाही. त्यामुळे रविवारी येरवडा पोलिस ठाण्यात या कैद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
