वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त जीवनामृत
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : आपण व्यक्तिगत पातळीवर सेवा करतो परंतु त्याहीपेक्षा संघाची सेवा अधिक महत्त्वाची असते. त्यातून संपूर्ण पुण्य मिळते आणि संघाची सेवा करणाराच तीर्थंकर बनू शकतो, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले.
वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने आयोजित प्रवचनमालेमध्ये पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी बहुमोल असा जीवन संदेश दिला. या प्रसंगी प. पु. साध्वी श्री शिलापीजी यांनीही मार्गदर्शन केले. प्रवचनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, निःस्वार्थ सेवेतून संपूर्ण पुण्य मिळते. व्यक्तिगत साधनेपेक्षा संघ साधना खूप महत्त्वाची असते. संघामध्ये जगणे हाच खरा धर्म आहे. धर्मक्षेत्रात जे सक्रीय आहेत, संघात योगदान देत आहेत त्याचा आनंद घेत आहेत त्यांनी आपल्या मुलांनाही हे संस्कार देऊन सहभागी करायला हवे.
आपल्या जैन धर्मात ९ प्रकारचे पुण्य सांगितेले आहे. त्यामध्ये आपल्या मनाची प्रसन्नता राखून ठेवणे हे सुद्धा पुण्यच आहे. जितके तुम्ही प्रसन्न राहाल तेवढे पुण्य प्राप्त होईल.
मन दुःखी असेल तर ते पाप ठरेल आणि अशी व्यक्ती इतरांनाही दुःखी करेल.
त्यामुळे आनंद राहून सेवा कार्यात रममाण व्हावे त्याने मन प्रसन्न होते. त्यासाठी शब्दांनी आपण कुणालाही दुखवू नये. जितकी आवश्यकता असेल तितकाच शब्दांचा वापर करा. संघामध्ये समविचारी लोक एकत्र येतात. धर्माचा संबंध संघाशी आहे.
तिथे आपण दया, प्रेम, करुणा या माध्यमातून सेवा देऊ शकतो, त्यामुळे सेवेची संधी आयुष्यात मिळत असेल तर ती कधीही जाऊ देऊ नका, असा संदेश त्यांनी दिला. प. पु. साध्वी श्री शिलापीजी यांनी उपवासाचे, एकटे राहण्याचे आणि दानाचे महत्त्व कथन केले. त्या म्हणाल्या, भगवान महावीरांनी जे विचार मांडले तेच आजचे आधुनिक विज्ञान सांगत आहे.
जैन परंपरेत उपवासाचे त्याच प्रमाणे संथाराचे महत्त्व आहे. शरीराची आवश्यकता नाही म्हणून इच्छेने शरीर सोडण्याचे व्रत म्हणजे संथारा.पाश्चिमात्य देशामध्ये दयामरण आहे. परंतु संथारा आणि दयामरण यात खूप फरक आहे. इच्छेने शरीर त्यागणे या मागची भावना खूप वेगळी आहे.
आपल्याला सतत कुणाची तरी साथ हवी असते. दुसऱ्याचा प्रतिसाद आपल्याला सतत आवश्यक वाटत असतो. दीक्षा मात्र एकट्याने घ्यायची असते म्हणून त्याचे मोल अधिक आहे. आपण सतत भविष्याची चिंता बाळगून असतो, भविष्याची चिंता असते. त्यापासून मुक्त व्हायला हवे. जीवनातील भौतिक सुखे ही साधन आहेत साध्य नाही याचे भान यायला हवे.
