महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील बहुप्रतीक्षित सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम अखेर विद्यापीठाने जाहीर केला आहे. त्यानुसार आता ही निवडणूक २२ सप्टेंबरला होणार असून दोन वर्षांनी विद्यापीठाला पदवीधर सिनेट सदस्य मिळनार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची मुदत सप्टेंबर २०२२ मध्ये संपुष्टात आली होती. त्यानंतर लागलीच नवी सिनेट निवडून येणे अपेक्षित होते. मात्र विद्यापीठाने २२ नोव्हेंबर २०२२ रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यावेळी सिनेट निवडणुकीसाठी एक लाख १३ हजार पदवीधरांनी मतदार म्हणून नोंदणी केली होती.
विद्यापीठाने या मतदार अर्जाची छाननी केल्यावर २० हजार पदवीधरांची नोंदणी अंतिम झाली होती. ही मतदार यादी ९ ऑगस्ट २०२३ ला विद्यापीठाने जाहीर करून त्याच दिवशी निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला होता.
मात्र भाजप नेते आशिष शेलार यांनी बोगस मतदारांची नोंदणी केल्याचा आरोप केल्याने राज्य सरकारच्या सूचनेनुसार विद्यापीठाने ही निवडणूक प्रक्रिया रद्द केली होती. नियोजनानुसार या निवडणुकीसाठी मतदान यंदा २१ एप्रिलला घेण्याचे निश्चित झाले होते.
मात्र लोकसभा निवडणुकीमुळे ही प्रक्रिया पुढे ढकलली गेली होती. दरम्यान, विद्यापीठाने मतदार यादी ३१ जुलैला जाहीर केली होती. मात्र त्या दिवशी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला नसल्याने विद्यापीठावर टीका करण्यात आली होती.
निवडणुकीचा कार्यक्रम
१० सिनेट पदवीधर जागा
उमेदवारी अर्ज : ६ ऑगस्टपासून १२ ऑगस्टपर्यंत
२२ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर मतदान मतमोजणी
१३ हजार मतदार
- विद्यापीठाने जाहीर केलेल्या अंतिम मतदार यादीत तब्बल ५० टक्क्यांहून अधिक मतदारांना अपात्र करण्यात आले आहे. परिणामी विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील सिनेट निवडणुकीसाठी केवळ १३ हजार ४०६ मतदार उरले आहेत.
- दरम्यान, विद्यापीठाच्या पदवीधर जागांसाठी तब्बल २६ हजार ९४४ पदवीधरांनी नोंदणी केली होती.
