चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गुंतवणूकीच्या बहाण्याने लष्करातील निवृत्त जवानाची ७२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.
प्रफुल्ल कांबळे (वय ४२, पुणे), स्वप्नील ठाकरे (वय ३८, रा. मुंबई) आणि संदीप मुळे (वय ३८, रा. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आभासी चलनात (क्रिप्टो करन्सी) गुंतवणुकीच्या आमिषाने १९ सेवानिवृत्त जवान आणि त्यांच्या नातेवाइकांची ७२ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणात एका निवृत्त सैनिकासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यादव हे लष्करातून निवृत्त झाले आहेत. त्यांची एका निवृत्त सैनिका मार्फत आरोपी गणेश माळवदे याच्याशी ओळख झाली होती.
त्यावेळी माळवदे याने आरोपी नरेंद्र पवार याच्या समृद्ध ‘भारत ट्रेडिंग सर्व्हिस’ कंपनीच्या गुंतवणूक योजनेची माहिती तक्रारदाराला दिली. आभासी चलनात गुंतवणूक केल्यास २० महिन्यांत रक्कम दुप्पट करून देतो; तसेच गुंतवणूक केलेल्या एकूण रकमेतील दहा टक्के रक्कमही दरमहा परत केली जाईल, असे सांगितले.
या प्रकरणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात राजेश गोरख यादव (वय ४०, रा. खेंगरेवाडी, पांगारे, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून नरेंद्र बाळू पवार, (वय ४१, मालेगाव, नाशिक), माजी सैनिक गणेश माळवदे (वय ४२) व अन्य तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपींनी वाघोली, लोणावळा येथे गुंतवणूक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यादव यांच्यासह निवृत्त सैनिक, तसेच त्यांच्या नातेवाइकांनी ही गुंतवणूक केली होती. हा तपास सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख करीत आहे.















