समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
पुणे : कर्जाची परत फेड करण्यासाठी चोरल्या तब्बल १० दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला समर्थ पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत दि.३१ जुलै रोजी फिर्यादी यांची स्प्लेंडर मोटरसायकल चोरी झाली होती व त्यांच्या तक्रारीवरून समर्थ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे.
दर गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी व अमंलदार करीत होते. दाखल गुन्हयातील चोरी झालेल्या मोटरसायकलचा शोध घेण्याकरीता तपास पथकाने गुन्हा घडल्याच्या ठिकाणापासुन सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तपासले.
तसेच पोलीस अंमलदार कल्याण बोराडे, शरद घोरपडे यांच्या गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असताना सारस्वत कॉलनी, सोमवार पेठ परीसरात एक इसम त्याच्याकडे पाहत त्याच्या मोटरसायकलवरून पळून जावू लागला.
त्याचा पाठलाग करुन सोबतचे पोलीस स्टाफच्या मदतीने समर्थ पोलीस स्टेशन येथे आणुन विश्वासात घेवून त्याचेकडे माहिती घेतली असता सदर इसमाने त्याचे नाव अरविंद मोतीराम चव्हाण (वय ३९ वर्षे, रा. दौड, जि. पुणे) असे सांगुन त्याच्या ताब्यातील मोटरसायकल शाहु उद्यान, सोमवार पेठ एस व्ही युनिअन शाळेसमोरून चोरी केली असल्याची कबुली दिली.
सदरची मोटरसायकल चोरीस गेलेबाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. सदर इसमास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली. त्याचेकडे अधिक तपास केला असता आरोपीने त्याचेवर झालेल्या कर्जाची परतफेड करण्याकरीता यापुर्वी पुणे रेल्वे स्टेशन परीसरातील दुचाकी वाहनांची चोरी करुन दौड परीसरातील लोकांना सदरची वाहने स्वताःचीच आहेत असे खोटे सांगुन विकली असल्याबाबत कबुली दिली.
आरोपीकडुन तब्बल १० दुचाकी जप्त करण्यात आल्या असुन यामध्ये बंडगार्डन पोलीस स्टेशन, व समर्थ पोलीस स्टेशन, येथील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. सदरची कामगिरी ही समर्थ पोलीस स्टेशनचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उमेश गित्ते, यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक सुनिल रणदिवे, जालिंदर फडतरे, सहा. पोलीस फौजदार, संतोष पगार, पोलीस अंमलदार इम्रान शेख, रोहीदास वाघेरे, रविंद्र औचरे शिवा कांबळे, अमोल गावडे, रहीम शेख, शरद घोरपडे, कल्याण बोराडे, अविनाश दरवडे, अर्जुन कुडाळकर यांनी केली आहे.
