वारजे पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शहराच्या विविध भागातील सायकल चोरी झाल्याची घटना गेल्या काही दिवसात वाढल्या आहेत. दरम्यान, सायकली चोरी करणाऱ्या दोन जणांना वारजे पोलिसांनी कर्वेनगर मधून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या ३० सायकली जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दीड वर्षांपासून या दोन चोरट्यांनी रस्त्यावरून आणि निवासी भागातून मौजमजेसाठी या सायकली चोरल्याचे समोर आले आहे. शिवशंकर राजेंद्र जाधव (वय ३०, रा. कर्वेनगर) आणि अभिषेक प्रकाश जाधव (वय २४, रा. कर्वेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायकल चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सायकल चोरट्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली.
त्यावेळी दोन जण चोरीच्या सायकल वापरत असल्याची माहिती पोलीस अंमलदार अमोल सुतकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा लावून शिवशंकर आणि अभिषेक यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील एक सायकल वारज्यातील शोभापूरम सोसायटीच्या आवारातून चोरी गेलेली सायकल असल्याचे स्पष्ट झाले.
त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी सायकली चोरल्याची कबुली दिली. पोलिसांच्या पथकाने त्यांच्याकडून ३० सायकली जप्त केल्या. या सायकली त्यांनी गेल्या दीड वर्षांत पासून चोरल्याचे तपासात उघड झाले. आरोपी शिवशंकर आणि अभिषेक दोघेही कर्वेनगर भागात राहत आहेत.
मिळेल ते काम करून ते उदरनिर्वाह करतात. मौजमजेसाठी दोघांनीही मिळून सायकली चोरल्या. त्यांनी सायकलची विक्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यामुळे या सायकल तशाच पडून होत्या.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, गुन्हे शाखा निरीक्षक निळकंठ जगताप, उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, अंमलदार प्रदीप शेलार, मनोज पवार, संभाजी दराडे, विकास पोकळे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

















