वर्धमान प्रतिष्ठानमध्ये बहुमोल असे विचारदर्शन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : चांगले काम करण्यात नक्कीच पुण्य आहे, चांगले काम करण्यासाठी इतरांना प्रोत्साहित करण्यात अधिक पुण्य आहे आणि अधिक पुण्य अनुमोदनेतसुद्धा आहे. अनुमोदना अजिबात सोपी नाही. कारण आपल्यामध्ये असणारा अहंकार आपल्याला अडवत असतो. दुसऱ्याच्या कामाची प्रशंसा करणे सोपे नाही. निःस्वार्थ भावनेने इतरांच्या चांगल्या गोष्टींची प्रशंसा करायला शिका, असे आवाहन प. पु. साध्वी श्री शिलापीजी यांनी केले.
वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांची प्रवचनमाला आयोजित केलेली आहे. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नैरोबीतून आलेले युवक आजच्या प्रवचनमालेत सहभागी झालेले होते.
प. पु. साध्वी श्री शिलापीजी यांनी आज लोकस्वरुप या भावनेवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, शास्त्रांमध्ये असे काय लिहिलेले आहे की आपल्याला ते वारंवार ऐकावेसे वाटते. साधकांनी या शास्त्रांचेच पठण करून सिद्धी प्राप्त केल्या आहेत. हे शास्त्र आपल्यासाठी प्रेरणास्रोत आहेत. जीवन अडीच हजार वर्षांपूर्वी जसे होते तसेच आहे.
जीवनातील साधने बदलली असली तरी जीवन आहे तसेच आहेत. आपले मन पूर्वी जसे होते तसेच आहे. त्यामुळे साधकांचे जीवन आपल्यासाठी प्रेरणास्रोत आहे. कारण आव्हाने तेव्हाही होती. त्यावर मात करून हे साधक साधनेच्या मार्गावर चालत आलेले आहेत.
प. पु. साध्वी श्री शिलापीजी पुढे म्हणाल्या, संचाराची माध्यमे वाढलेली आहेत. चांगल्या गोष्टींचा प्रचार कमी होतो आणि वाईट गोष्टींचा प्रचार अधिक होतो. असे का होते कारण आपल्यालाही नकारात्मक वाचावेसे वाटते. चांगले काम होत असेल तर आपण आनंदाने वाचत नाही. पण नकारात्मक बातम्यांकडे ओढा अधिक असतो.
चांगले काही करण्यात पुण्य आहे, करवून घेण्यात अधिक आहे आणि अधिक पुण्य अनुमोदनेतसुद्धा आहे. अनुमोदना सोपी नाही. कारण आपल्यामध्ये असणारा अहंकारच आपल्याला अडवत असतो. दुसऱ्याच्या कामाची प्रशंसा करणे सोपे नाही.
प्रेम, करुणा यांच्याविषयी बोलून काही उपयोग नाही. त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. प्रेम करण्यासाठी प्रयत्न करावे लागू नयेत तो सहस स्वभाव बनावा. आपण ज्या १२ भावनांची ओळख करून घेत आहोत तो याच साधनेचा भाग आहे. ऐकण्याबरोबर त्या भावनेचा स्पर्श जीवनाला होणे आवश्यक आहे, असे मत प. पु. साध्वी श्री शिलापीजी यांनी व्यक्त केले.