भारती विद्यापीठ आणि हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कंपनीच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवून दोघांची १३ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ आणि हडपसर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक माहितीनुसार, कात्रज परिसरात राहणाऱ्या प्रदीप दिनकर बारडे (वय ३९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रिचार्जचे पैसे भरूनही रिचार्ज न झाल्याने इंटरनेटवरून काढलेल्या कस्टमर केअर क्रमांकावर त्यांनी फोन केला.
त्यावेळी रिचार्ज पैसे परत पाठवत असून, लिंक क्लिक केल्यावर आपले पैसे जमा होतील, असे सांगितले. लिंक केल्यावर डाऊनलोड झालेल्या अॅपद्वारे सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून तब्बल आठ लाख १० हजार रुपये परस्पर ट्रान्सफर करून घेतले.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक झिने करत आहेत. दुसऱ्या घटनेत हडपसर परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. खाते व्हेरिफिकेशनच्या नावाखाली मोबाईलचा अॅक्सेस मिळवून ४ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
 
			


















