कोरेगाव पार्क पोलिसांनी एकाला केली अटक, ६३० किलो चांदी जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सोने-चांदी घेऊन त्याबदल्यात कारागिरांकडून दागिने बनवून घेण्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने सराफांकडून चांदी व सोने घेऊन तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल ६३० किलो चांदी व चांदीच्या वस्तू जप्त केल्या आहेत.
याबाबत संजय पुष्कराज राठोड (वय ५५, रा. सुजय गार्डन, मुंकुदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अमन कोरीमुथा (वय २७, रा. शांतीनगर सोसायटी, महात्मा फुले पेठ) याला अटक केली आहे. तसेच पंकज जैन (कोरीमुथा), नेमीचंद कोरीमुथा, प्रणव कोरीमुथा (रा. शांतीनगर सोसायटी, महात्मा फुले पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार २२ जानेवारी २०२६ रोजी बंडगार्डन रोडवरील राठोड ज्वेलर्स येथे घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय राठोड यांचे बंडगार्डन रोडवर ‘राठोड ज्वेलर्स’ हे दुकान आहे. पंकज जैन व नेमीचंद कोरीमुथा हे ‘नवकार ज्वेलर्स’ व ‘श्री नवकार प्लस’ या ज्वेलर्सचे मालक आहेत.
राठोड यांनी नवीन माल बनवण्यासाठी त्यांना ६० किलो चांदी दिली होती. दोन ते तीन दिवसांत नवीन माल देण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. मात्र, ठरलेल्या मुदतीत त्यांनी नवीन वस्तू बनवून दिल्या नाहीत.
यानंतर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे राठोड यांनी इतर व्यावसायिक मित्रांकडे चौकशी केली. त्यावेळी हरी विजय बाळकृष्ण देवकर यांच्याकडून त्यांनी ९८ लाख रुपये घेतल्याचे तसेच उमेश दराडे यांना ५० किलो चांदी देण्याचा वायदा करून त्यांच्याकडून ४० लाख रुपये घेतल्याचे समोर आले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राठोड यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी या व्यवहाराकडे लक्ष ठेवणारा त्यांचा पुतण्या अमन कोरीमुथा याला अटक केली आहे. त्याच्याकडून वेगवेगळ्या सराफांकडून घेतलेली ६३० किलो चांदी तसेच चांदीचे दागिने व वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. इतर आरोपींचा शोध सुरू असून पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण पुढील तपास करीत आहेत.















